मलकापूर – हिंगणा काजी येथे महावितरणच्या डीपीवरील शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून एक घर, जनावरांचा गोठा आणि ट्रॅक्टर जळून खाक झाले. आगीत दोन गायी होरपळून जखमी झाल्या असून, वीस कबुतरे मृत्युमुखी पडली. ही घटना 19 एप्रिल रोनी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
शॉर्टसर्किटमुळे डीपीवरून ठिणग्या उडाल्या व जवळील वाळलेल्या गवताला आग लागली. ही आग रमेश रायबान गनथीरे यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचली. गोठ्याशेजारी दुर्गा श्रीराम कल्याणकर यांचे टीनपत्र्यांचे घर व गणेश निनाजी भुंबे यांचे ट्रॅक्टर उभे होते. काही क्षणांतच आग पसरली आणि संपूर्ण गोठा व घर भस्मसात झाले. घटनेत घरातील साहित्य पूर्णत: जळून खाक झाले. गोठ्यातील दोन गायी गंभीर जखमी झाल्या, तसेच परिसरातील कबुतरे आगीच्या झळांनी मृत्युमुखी पडली. ट्रॅक्टरसुद्धा पूर्णतः जळाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
आगीची माहिती मिळताच मलकापूर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बाजार समिती संचालक मधुकर फासे, पोलीस पाटील फासे, शेख असलम यांच्यासह नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले.
सिलिंडरचे संकट टळले
आग लागलेल्या घरात दोन गॅस सिलिंडर असल्याची माहिती मिळाल्यानंतर संतोष अकोटकर यांनी धाडस दाखवत सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांनी ट्रॅक्टरही स्वतः चालवत सुरक्षित स्थळी हलविले. त्यांच्या या प्रयत्नाचे पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी कौतुक केले. या घटनेची माहिती तहसील कार्यालय, वीज वितरण कंपनी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि बुलढाणा नियंत्रण कक्षाला देण्यात आली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप काळे, कर्मचारी रविकांत बावस्कर, सावे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.