मलकापूर (दिपक इटणारे): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात महायुतीने आणि महाविकास आघाडीने प्रत्येकी वेगवेगळ्या रणनीती अवलंबल्या आहेत. महायुतीने अधिकतर ठिकाणी जुन्या आमदारांवर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने संजय कुटे, श्वेता महाले आणि आकाश फुंडकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे, तर शिंदे गटाने संजय गायकवाड आणि डॉ. संजय रायमुलकर यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. माजी आमदार चैनसुख संचेती यांनाही मलकापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीने काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देत बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. बुलढाणा मतदारसंघात ॲड. जयश्रीताई शेळके आणि मेहकरमध्ये सिद्धार्थ खरात हे नवीन चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या उमेदवारीची पुन्हा दावेदारी सिद्ध केली आहे, तर काँग्रेसने मलकापूरमधून राजेश एकडे, चिखलीतून राहुल बोंद्रे आणि खामगावातून राणा दिलीप कुमार सानंदा यांना उमेदवारी दिली आहे. जळगाव जामोदमधून डॉ. स्वाती वाकेकर यांना संधी दिली आहे. या निवडणुकीत मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव आणि चिखली या प्रमुख मतदारसंघांमध्ये स्थानिक पातळीवरील जुन्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरस दिसणार आहे. महायुतीतील उमेदवार एकमेकांचे राजकीय सामर्थ्य आणि मर्यादा ओळखतात, त्यामुळे लढती अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफूटीनंतर जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणे उदयास येत आहेत, जी निवडणुकीच्या अंतिम निकालावर परिणाम करू शकतात. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याचा लाभ महायुतीला होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीकडून मेहकरमध्ये ऋतुजा चव्हाण, सिंदखेडराजात सविता मुंडे, बुलढाण्यात सदानंद माळी, आणि मलकापूरमध्ये शहजाद खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिखली, खामगाव आणि जळगाव जामोद येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीवर परिणाम करू शकतात. नव्या कार्यकर्त्यांच्या संधीसाठी होत असलेल्या मागणीमुळे पक्षांमध्ये बदलाचे संकेत होते, मात्र बहुतेक पक्षांनी प्रमुख ठिकाणी जुन्या उमेदवारांना संधी दिल्याने नवीन चेहऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी: जुन्या चेहऱ्यांचा विश्वास आणि नव्या उमेदवारांची ताकद
