मलकापूर :नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे ईदच्या कार्यक्रमात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केली आहे.
या संदर्भात मलकापूर येथे आज, १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारामार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद केले आहे की, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे १६ सप्टेंबर रोजी काही समाजकंटकांनी ईदच्या मिरवणुकीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निदर्शनास आले आहे. या संदर्भात नांदुरा येथे बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.परंतु, देशविघातक कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा अद्याप दाखल नाही. व्हिडिओमध्ये स्पष्ट असताना व व्हिडीओ त्याच गावातील मुस्लिम नागरिकांनी समाजातील स्टेटस, फेसबुकवर व्हायरल केला असताना हे पुरावे असूनही देशद्रोहाचे कलम लावण्यात आले नाही.
या गुन्ह्याची लवरकरात लवकर चौकशी करून पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांवर कडक कारवाईचे आदेश संबंधीत विभागास देण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशविरोधी शक्तींनी संपूर्ण महाराष्ट्रात डोके वर काढल्याची घटना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशीच घटना अकोल्यात दहशतवाद्याचे पोस्टर ईदच्या मिरवणूकीत लावल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा देशद्रोही लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करावे, अन्यथा बजरंग दल लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हनुमान सेना व इतर हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.