मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलमध्ये गणेश उत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सात दिवसांच्या भक्तीमय वातावरणानंतर काल (२ सप्टेंबर) लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला.
गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. विद्यार्थ्यांनी लेझीम, पारंपरिक नृत्य आणि ढोल-ताशांच्या तालावर एक वेगळाच उत्साह निर्माण केला. शाळेच्या प्राचार्य श्री. सुरेश खर्चे सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना गणेश उत्सवाचा शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, अशा सण-उत्सवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐक्यभाव, भक्तीभाव आणि संस्कृतीविषयी आदराची भावना वाढीस लागते. शेवटी विधिवत पूजन करून गणपती बाप्पाचे विसर्जन नळगंगा नदीत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिकांचे तसेच शालेय व्यवस्थापनाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या असा मनापासून आर्त हाक दिली.
