बुलडाणा : भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने सैन्यातील जवानासह दोघे ठार झाले. ही घटना 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजता मोताळा- वडगाव रस्त्यावर अंत्री शिवारात घडली.
मोताळा तालुक्यातील अंत्री येथील दीपक महादेव पवार आणि लिहा येथील गजानन जगदेव सोळंके हे दोघे मावसभाऊ आज 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्रमांक एमएच 28 एएक्स 5705) मोताळ्याकडून वडगावकडे जात होते. या दरम्यान अंत्री शिवारात त्यांची भरधाव दुचाकी रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत तायडे, पोलीस काँस्टेबल सुनील भवटे आणि गणेश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या मदतीने दोघांना उपचारासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी गजानन सोळंके यांना मृत घोषित केले.
15 दिवसांच्या सुट्टीवर आले होते सोळंके
भारतीय सैन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये कार्यरत असलेले जवान गजानन जगदेव सोळंके हे अरुणाचल प्रदेशात कार्यरत आहेत. पाच-सहा दिवसांअगोदरच ते सुट्टीवर आपल्या गावी लिहा येथे आले. पुणे येथे विमानतळावर कार्यरत दीपक महादेव पवार यांना भेटण्यासाठी त्यांनी पुण्यावरून बोलावले होते. दोघेही दुपारी दुचाकीने मोताळा येथे गेले होते. तेथून सायंकाळी गावाकडे परत येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.