दिनांक २६/०५/२०२४ रोजी अचानक आलेल्या चक्रीवादळ व पूर्व मोसमी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नांदुरा मोताळा बुलढाणा शेगाव खामगाव जळगाव संग्रामपूर सह संपूर्ण जिल्ह्यात या वादळामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या वादळामुळे शेतकऱ्यांचे, शेती पिकाचे, घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. तसेच शेतीपूरक उद्योगाचे सुद्धा नुकसान झालेले होते, अनेक जनावरे मृत्युमुखी पडलेत, काही ठिकाणी जीवित हानी सुद्धा झाली. कुठे घरे पडलीत, मोठ्या प्रमाणात घरावरील टीन पत्रे उडून गेलेली होते. त्यामुळे अनेक महिलांचे संसार उघड्यावर पडले, त्यांचे आर्थिक सोबतच वैयक्तिक, शारीरीक नुकसान झाले आहे. त्या संदर्भात अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रेमलता सोनोने यांनी अनेक महिलांच्या समवेत दि. १९ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व उप विभागीय कार्यालयात निवेदन देऊन मागणी केली होती. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी साहेब आणि उप विभागीय कार्यालयानी संघटनेच्या मागणीची दखल घेत सर्वे केला यासाठी संघटना आभारी आहे. परंतु अजूनपर्यंत कोणत्याच नुकसानग्रस्तांना कुठल्याच प्रकारची नुकसानभरपाई मिळालेली नाही. तरी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रेमलता सोनोने यांनी असंख्य महिलांसोबत असे निवेदन उप विभागीय कार्यालय मलकापुर येथे दि. ०८/०८/२०२४ रोज़ी देण्यात आले.