मलकापूर:- गैरलाभ मिळविण्याच्या उद्देशाने २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मलकापूर एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस हेडकॉन्स्टेबलवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकसेवक सतीश रतन वैद्यकर (वय ४०, पोलीस हेडकॉन्स्टेबल, पो. स्टे. एमआयडीसी दसरखेड, मलकापूर) याने तक्रारदार विजय ठाकूर यांच्या नावावर असलेल्या वाहनाच्या अपघातानंतर, त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात २५,००० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १०,००० रुपयांवर समझोता झाला होता. दि. ६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा लाचलुचपत विभागाने सापळा कार्यवाही आयोजित केली असता, आरोपी सतीश वैद्यकर यांनी तक्रारदाराच्या हालचालीवर संशय घेतल्याने लाच स्वीकारली नाही. तरीही, गैरलाभ मिळविण्याच्या उद्देशाने लाचेची मागणी केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास घुसिंगे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा) यांच्याकडे आहे.