मलकापूर ( दिपक इटणारे ): शहरातील इंटरनेट वापरकर्त्यांसाठी जिओ फायबर ही आधुनिक सुविधा ठरावी, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाळा सुरू होताच जिओ फायबरचा “हाय-टेक” बॉक्स हा पाण्याचा डबा ठरू लागला आहे. बॉक्समध्ये पाणी शिरल्याने नेटवर्क सतत खंडित होत असून, नागरिकांना महागड्या शुल्कामध्ये फक्त डोकेदुखीच मिळते आहे.
शहरातील बहुसंख्य घरांमध्ये जिओ फायबर कनेक्शन बसवले गेले आहे. महिन्याला तब्बल ७०० ते १,००० रुपये देऊन नेट घेतले जात असले तरी आठवड्यातले सात-आठ दिवस नेटवर्क गायब असते. नागरिकांना अपेक्षित वेग, सेवा किंवा विश्वासार्हता यापैकी काहीच मिळत नसल्याने जिओ फायबर हा आता “भकास फायबर” ठरत चालला आहे. नागरिकांचा संताप असा की, वारंवार तक्रार करूनही कंपनीचे एजंट फोनवर केवळ “हो हो” करत ग्राहकांची बोळवण करतात. पण सेवा दुरुस्त करण्यासाठी वेळेत कोणीही धाव घेत नाही. तक्रार दाखल करूनही कर्मचारी आठवडाभरही दारात येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना इंटरनेटशिवाय कामकाज ठप्प करावे लागते, तर ऑनलाईन शिक्षण, बँकिंग, ई-कॉमर्स आणि कामधंद्यावर थेट परिणाम होत आहे. दरम्यान, नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून “सेवा नाही, तरीही पैसे द्या” असा अनुभव येत आहे. यामुळे अनेक जिओ फायबर धारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पावसाळ्यात बॉक्समध्ये पाणी जाणे, नेटवर्क सतत डाऊन होणे आणि तक्रारीकडे दुर्लक्ष करणे – यामुळे मलकापूरात जिओ फायबरबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “ग्राहकांना फसवणूक करून जिओ फक्त पैसे उकळत आहे” असा सूर नागरिकांमध्ये उमटू लागला आहे.