मलकापूर :- राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक कार्यात सदैव तत्पर असलेले सुपरिचित व्यक्तिमत्व सुहास (बंडू भाऊ) चवरे यांनी मलकापूर आगारातील प्रवाशी, चालक, वाहक तसेच परिवहन मंडळाच्या हितास्तव २१८ नवीन दिशा पाट्या (मार्गफलक) उपलब्ध करून दिल्या आहेत. या कार्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरसोयीस मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.दररोज प्रवाशांना गाडी कोठे जात आहे, हे समजण्यासाठी चालक किंवा वाहक यांना तोंडी विचारावे लागत होते. मात्र अनेकदा अनावधानाने चुकीची गाडी पकडली जात असल्याने प्रवाशांना मनस्ताप होण्यासोबतच महामंडळाचे उत्पन्नही कमी होत होते. ही समस्या ओळखून चवरे यांनी मानवतेचा परिचय देत आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवीन २१८ मार्गफलक देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रस्तावाला कर्मचारी बांधव व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ कृती केली. आगार व्यवस्थापक मुकुंदजी नाह्वकर, लेखाकार गणेशजी चौधरी, टी.आय. सत्यजीतजी सावकाश, टी.आय. समीरजी देशमुख, सुनीलजी मुंधोकार, अशोकजी शंखपाळ, लिपिक धर्मराजजी इंगळे, वाहतूक नियंत्रक अविनाशजी वंजारी, वाहन परीक्षक विनोदजी रावणकार व चालक शांतारामजी पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ॲड. सम्यक चवरे यांनी हे मार्गफलक सुपूर्द केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रवाशांच्या सोयीसाठी व महामंडळाच्या हितासाठी केलेल्या या अनोख्या योगदानाबद्दल चवरे यांचे अभिनंदन होत आहे.
