मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या ओढीने आणि सामाजिक जाणिवेच्या भावनेने साजरा करण्यात आला. महाविद्यालय परिसर देशभक्तीपर गीतांनी, तिरंग्याच्या सजावटीने आणि विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमून गेला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सई चोपडे आणि डॉ. जयश्री खर्चे उपस्थित होते. देशभक्तीच्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देताना विद्यार्थ्यांपासून ते प्राध्यापक व कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच “भारत माता की जय” व “वंदे मातरम” च्या जयघोषात राष्ट्रप्रेमाची प्रचिती दिली.
कार्यक्रमाचे मनमोहक सूत्रसंचालन प्रा. नेहा मालोकार यांनी केले. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्वातंत्र्याच्या संघर्षमय इतिहासाची आठवण करून दिली. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून देत विद्यार्थ्यांना समाजासाठी जबाबदार नागरिक बनण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने मागील आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसरात जागृती केली. ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली व परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
‘नशा मुक्ती अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाची शपथ देण्यात आली. व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगताना आरोग्यदायी व स्वच्छ जीवन जगण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. ‘अँटी रॅगिंग जनजागृती अभियान’ हेही या आठवड्यात प्रा. तेजल खर्चे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी व्याख्याने, फलक प्रदर्शन व संवाद सत्रांद्वारे जागृत करण्यात आले. नवीन व जुन्या विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय स्वच्छता अभियान, वृक्षारोपण उपक्रम तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी व युवकशक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आय क्यू ए सी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. संदीप खाचने, एन सी सी ऑफिसर प्रा. जावेद, प्रा. कैलास कोळी, सर्व विभागप्रमुख, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची जाणीव, सामाजिक बांधिलकीची भावना आणि जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व सामाजिक संवेदनशीलता रुजविण्याचा केलेला हा उपक्रम उल्लेखनीय ठरला.