मलकापूर ( दिपक इटणारे ): मलकापूर बस स्थानकातील पार्सल ऑफिसमध्ये ऑनलाइन पावतीपेक्षा अधिक रक्कम आकारून शेतकरी आणि व्यापारी वर्गाची लुट होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण भागातून बसद्वारे आपला माल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांन कडून जास्त पैसे आकारून फसवत आहेत. यामुळे कष्टकरी शेतकरी आणि लहान व्यापारी वर्गाला आर्थिक फटका बसत आहे.
प्रत्येक गावातून येणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांचा माल दररोज पार्सल ऑफिसमध्ये येतो. शेतकरी आपल्या शेतात मेहनत करून मिळवलेली तूटक रक्कम वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण पार्सल ऑफिसच्या गैरव्यवहारामुळे त्यांना दुहेरी फटका बसतो आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, ऑनलाईन पावतीपेक्षा 20 ते 30 रुपय अधिक रक्कम वसूल केली जात आहे, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होत आहे.
या प्रकरणात स्थानिक आगार प्रमुखांना माहिती विचारली असता, त्यांनी अधिकृत तक्रार आल्यास कठोर कारवाईचे आश्वासन दिले. पार्सल ऑफिसमध्ये होणाऱ्या या गैरप्रकारांमुळे संतप्त झालेल्या शेतकरी आणि व्यापारी वर्गाने या कार्यालयाचे टेंडर तातडीने रद्द करून, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी लवकरात लवकर कठोर पावले उचलली नाहीत, तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा संताप वाढण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे मलकापूर बस स्थानकातील पार्सल ऑफिसमध्ये असलेल्या व्यवस्थेत बदल करून, त्याला पारदर्शकता आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
एका शेतकऱ्यांचे पार्सल मलकापूर वरून खामगाव येथे पाठवायचे होते. त्यांची पावती 50 रु होती मात्र त्या कडून 70 रु घेण्यात आले. तर एका शेतकऱ्यांचे पार्सल मलकापूर वरून यवतमाळ येथे पाठवायचे होते त्याची ऑनलाइन पावती 100रु होती त्यांच्या कडून 130 रु घेण्यात आले. या प्रकाराची तक्रार करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ऑनलाइन पावती पेक्षा अधिक रक्कम कोणत्याही पार्सल देणाऱ्या व्यक्तीने देऊच नये. कोणाचीही तक्रार आल्यास आम्ही कारवाही करू.
आगार प्रमुख मुकुंद नाव्हकार