मलकापूर: लोक सेवा शिक्षण मंडळ अंतर्गत कार्यरत पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी कृषी केंद्र व एलिट गृपचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून संमेलनाची शोभा वाढवली. संमेलनाचे अध्यक्षपद एलिट गृपचे सर्वेसर्वा श्री. अण्णासाहेब पाटील उपाख्य पुरुषोत्तम निनू पाटील यांनी भूषवले. महाविद्यालयाचे चेअरमन, लोक सेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब पाटील उपाख्य ज्ञानदेव निनू पाटील व एलिट गृपचे मालक श्री. गजेंद्र सोपानराव पाटील हे प्रमुख पाहुणे होते, तर या प्रसंगी श्री. प्रमोद पुरुषोत्तम पाटील, श्री. विनोद पुरुषोत्तम पाटील, श्री. पराग ज्ञानदेव पाटील, आणि श्री. निलेश ज्ञानदेव पाटील विशेष उपस्थित राहिले. तसेच पाटील परिवारातील सदस्य आणि दोन्ही गृपमधील माजी व आजी सहकारी कर्मचारी यांनीही कार्यक्रमात हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. देवी सरस्वती, कै. निनूबुआ पाटील, व कै. बापूसाहेब उपाख्य सोपानराव निनू पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. श्री. वासुदेव भंगाळे यांनी प्रास्ताविकात संमेलनाचे उद्दिष्ट आणि आयोजनाचे महत्त्व मांडले, तसेच सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमात गृपमधील दिवंगत सहकार्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ सहकार्यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी आपले विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शशिकांत सोनवणे यांनी प्रभावी शैलीत केले, ज्यामुळे संमेलनाची शोभा अधिकच वाढली. संयोजक श्री. वासुदेव भंगाळे, श्री. सुधिर भाऊ चोपडे, श्री. चंद्रशेखर खाचणे व श्री. वासुदेव सरोदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन उत्तम प्रकारे केले.
लोक सेवा शिक्षण मंडळ अंतर्गत असलेले पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे मलकापूरमधील अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. श्री. नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य प्रदान करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे. आधुनिक प्रयोगशाळा, कुशल प्राध्यापक, आणि विविध उपक्रमांमुळे हे महाविद्यालय विद्यार्जनात अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन प्रकल्प, उद्योग संपर्क, व कौशल्यविकासात महत्त्वाची संधी मिळवून देण्यात महाविद्यालयाचे विशेष योगदान आहे. संमेलनाचा समारोप पाटील परिवाराच्या वतीने दिवाळी व कै. बापूसाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ भेटवस्तू देऊन करण्यात आला. उपस्थित सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत, ही एक अविस्मरणीय संधी अनुभवली.