खामगाव : प्रेमविवाहानंतर पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादात समेट घडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला सासरच्या दोन नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत.
तक्रारीनुसार, जयरामगड येथील श्याम रामभाऊ जाधव (६०) यांच्या मुलाचा विहिगाव (ता. खामगाव) येथील आदिनाथ व अनिल वाडेकर यांच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी श्याम जाधव, त्यांची पत्नी आणि मुलासह गेले असता, आदिनाथ आणि अनिल वाडेकर यांनी लोखंडी सळईने मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. या आरोपांवरून पोलिसांनी आदिनाथ व अनिल वाडेकर यांच्यावर भारतीय दंड संहिता ११८ (१), ३५२, ३५१, (२) (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याच घटनेत, आदिनाथ वाडेकर (४८) यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात, पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या वाडेकर कुटुंबावर जाधव कुटुंबाने संगनमत करून हल्ला केला, लोखंडी सळईने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच त्यांच्या गाडीची (एमएच-२८, बीके-७३३५) मागील काच फोडल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून सागर श्याम जाधव, प्रशांत श्याम जाधव, श्याम रामभाऊ जाधव आणि मीना रामभाऊ जाधव यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता ११८ (१), ३५२, ३५१, ३ (५), ३२४ (४/५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.