लोणार (५ डिसेंबर) : लोणार शहरातील सार्वजनिक विश्रामगृहाच्या मागील भागात असलेल्या प्रकाश रामराव मापारी यांच्या गोठ्यात ५ डिसेंबरच्या रात्री बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ४ शेळ्या ठार झाल्या, ज्यामुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचारी, आरएफओ अंकुश येवले, वनपाल कायंदे आणि वनरक्षक कैलास चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. वनविभागाकडून लवकरच संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.सदर घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, सरोवर परिसरातील वन्यजीव अभयारण्यामुळे बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने नागरिकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आरएफओ अंकुश येवले यांनी सर्व नागरिकांना परिसरात विशेष काळजी घेण्याचे सांगितले आहे.
लोणार शहरातील शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, 4 शेळ्या ठार, परिसरात भीतीचे वातावरण!
