Headlines

हिंगणा काझी ग्रामवासियांच्या समस्येसाठी तहसीलदारांना निवेदन, मागणीची दाखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा

मलकापूर :- आज दिनांक 05.09.2024 ला हिंगणा काझी ग्रामवासी यांनी गावातील शेत रस्ता तात्काळ पक्का करून मिळणे बाबत तसेच व्याघ्रा नदीवरील पुलाची निर्मिती तात्काळ करून देणे बाबत वंचित चे तालुका नेते अजय सावळे यांच्या नेतृत्वात आणि सुशील मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार राहुलजी तायडे तसेच विस्तार अधिकारी होळकर साहेब यांना संयुक्तपणे निवेदन दिले. सविस्तर बातमी अशी की मलकापूर तालुक्यातील ग्राम हिंगणाकाझी येथील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. तसेच या गावाला शेतात जाण्यासाठी जो नदीवरील पूल होणे आवश्यक आहे तो सुद्धा अद्याप पर्यंत झाला नाही. करिता गावातील लोकांनी ज्यांची जवळपास 600 हेक्‍टर जमीन ही नदीकाठच्या पलीकडे आहे त्या लोकांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करून शेतकामात जावे लागते.या अगोदर सुद्धा मागच्या महिन्यामध्ये व्याघ्रा नदीला नदीला आलेल्या पुरामुळे या गावचे पती-पत्नी पुरातून वाहून गेले होते.तरी प्रशासनाला कोणत्याही प्रकारे जाग आली नाही म्हणून आज गावातील सर्व धर्मीय जवळपास शंभर ते दीडशे नागरिक तहसील कार्यालयावर येऊन धडकले.तिथून त्यांनी वंचितचे तालुका नेते अजय सावळे यांच्याशी संपर्क साधला आणि आपल्या व्यथा त्यांना सांगितल्या. त्याची तात्काळ दखल घेत वंचितचे नेते अजय सावळे यांनी आपले सर्व कार्यकर्ते सुशील मोरे ,भीमराव नितुने ,गुड्डू सावळे ,प्रतापराव बिऱ्हाड यांना घेऊन तात्काळ तहसील कार्यालय गाठले. गावातील मंडळी समस्यांबाबत अतिशय आक्रमक झाली होती परंतु तहसीलदार राहुलजी तायडे यांनी सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळून नागरिकांच्या समस्या ऐकून लगेच त्या निवेदनावर दखल घेत निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी यांना तात्काळ पाठविण्यात आली. त्यानंतर सर्व गावकरी मंडळी आपल्या समस्यांची निवेदन घेऊन विस्तार अधिकारी श्री होळकर यांच्या कक्षात दाखल झाले. विस्तार अधिकारी यांच्याशी समस्येबाबत चर्चा करून त्यांना या समस्येची गंभीर दखल घेण्यास सांगितले. विस्तारधिकारी होळकर यांनी येथे आठ दिवसात सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

सदर मागण्यांवर येत्या पंधरा दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू असे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर हरिश्चंद्र रामचंद्र गुरचळ, राजूभाऊ शेगोकार, बाबुराव आकोटकर, सागर मोरे, रामभाऊ सुषिर, ख्वाजा वाहबुद्दीन ,इलाज काझी यांच्यासह जवळपास दोनशे ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *