मलकापूर 🙁 दिपक इटणारे ) “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…” अशा भावनिक जयघोषात मलकापूर शहराने अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. डोळ्यांत अश्रू, ओठांवर बाप्पाचे नाव आणि हृदयात भक्तिभाव अशी सगळीच वातावरण निर्मिती झाली होती. एकीकडे विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजराने वातावरण दुमदुमले होते तर दुसरीकडे “बाप्पा पुन्हा येणार” या भावनेने भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साहही दिसत होता. मलकापूर शहरातून काल ७ सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी शहरभर गणेशभक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विशेष म्हणजे, यंदा मिरवणुकीत डीजे संस्कृतीला पूर्णविराम मिळाला होता. त्याऐवजी ढोल, ताशा, झांज, लेझीम यांसारखी पारंपरिक वाद्ये घेऊन युवकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यावर ताल धरत लेझीम पथकाने सादर केलेल्या जोशपूर्ण खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे मिरवणुकीच्या मार्गावर अनेक व्यावसायिकांनी आणि सामाजिक संस्थांनी गणेश भक्तांसाठी मोफत खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. पोहे, खिचडी, फराळ तसेच थंड पाण्याची सोय केल्यामुळे भक्तांचा उत्साह अधिकच वाढला होता. शहरातील नागरिकांनी दाखवलेली ही सेवा वृत्ती आणि सामूहिक भावना समाजातील ऐक्य आणि परंपरेवरील श्रद्धा अधोरेखित करणारी ठरली. दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ गणेश मंडळांनी प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन आपल्या मंडपांतून विसर्जन मिरवणुका काढल्या. सर्व मंडळांनी शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाला निरोप देत आपली परंपरा जपली. मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते. यंदा गणपती आगमनाच्या दिवशीच पोलिसांनी तब्बल १२ डीजेंवर कारवाई केली होती. त्याचा परिणाम असा झाला की विसर्जन सोहळ्यात एकाही डीजेचा आवाज न वाजता फक्त पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणुका निघाल्या. त्यामुळे प्रशासनाच्या या कडक भूमिकेचे शहरभर कौतुक होत आहे. गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि एकोप्याचा पर्व. विसर्जनाच्या वेळी बाप्पाला निरोप देताना भावनांचे ढग दाटले तरी “पुढच्या वर्षी लवकर या…” ही आर्त हाक प्रत्येक भक्ताच्या अंत:करणातून उमटत होती. यंदाचा गणेश विसर्जन सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भक्तिभावाच्या लहरीत आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेत पार पडल्याने तो शहरवासीयांसाठी अभिमानाची आणि संस्मरणीय ठरला.