मलकापुरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनेतील आरोपीला आठ महिन्यानंतर जळगाव खा. मधून अटक! चांडक विद्यालय रोडवर घडली होती घटना

मलकापूर : शहरात २९ जानेवारी रोजी घडलेल्या मंगळसूत्र चोरीचा छडा लावण्यात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून मुख्य आरोपीस जळगाव खांदेशमधून अटक करण्यात आली. दरम्यान, त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.शहरातील देशपांडे गल्लीत राहणाऱ्या ऋतुजा श्रेयस व्यवहारे २९ जानेवारी रोजी स्कुटीने जात असताना त्यांच्यामागून दुचाकीवरून दोन युवक आले. त्यांनी ऋतुजा व्यवहारे गळ्यातील ४० ग्रॅम वजनाचू १ लाख रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने पळ काढला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व बी. बी. महामुनी यांनी या गुन्ह्याच्या तपासात मार्गदर्शन केले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करत गुन्ह्याचा तपास केला. गुन्ह्यातील आरोपींचा शोध व चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्याच्या सूचना केल्या. तसेच संशयित गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे, तांत्रिक स्वरूपातील बाबी पडताळणे, जिल्हा व जिल्ह्याबाहेरील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे याबाबत मार्गदर्शनही केले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, गजानन माळी, गणेश पाटील, गजानन गोरले, चालक विजय मुंडे या पथकाने आरोपी प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (वय २७, रा. जळगाव खांदेश) याला अटक केली. त्यानंतर त्याला मलकापूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत असून, या गुन्ह्यातील अन्य एका आरोपीचा व ऐवजाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!