मलकापूर ( उमेश इटणारे ):- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिगाव प्रकल्पाने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तब्बल 13,874 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवून या प्रकल्पाला आकार देण्याचे श्रेय माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना जाते. हा प्रकल्प जिल्ह्यातील पाणीपुरवठा, सिंचन, कृषी विकास, आणि रोजगार निर्मितीसाठी क्रांतिकारी ठरेल.
चैनसुख संचेती हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नेते नाहीत, तर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे खरे नेतृत्व आहेत. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेला जिगाव प्रकल्प, केवळ एक यशस्वी योजना नाही, तर त्यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीचा आणि अथक मेहनतीचा जिवंत पुरावा आहे. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
राजकीय क्षेत्रात मोठ्या योजना साकारण्यासाठी सातत्य, अभ्यास आणि दृढनिश्चयाची गरज असते, हे चैनसुख संचेती यांनी आपल्या कामातून दाखवून दिले. प्रशासकीय मान्यता मिळवणे ही एक गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा बनली आहे.
चैनसुख संचेती म्हणतात, “मलकापूरचा सर्वांगीण विकास हीच माझी प्राथमिकता आहे. जिगाव प्रकल्प हे त्याचे पहिले पाऊल असून, यामुळे जलसंपदा, कृषी आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रात अमूलाग्र बदल होईल.”
सिंचनाच्या सुविधांबरोबरच या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि त्यांची जीवनमान उंचावेल. या यशस्वी प्रयत्नांमुळे संचेती यांचे नेतृत्व आणि कार्यक्षमता यांची दखल आता मतदार घेऊ लागले आहेत. त्यांनी दाखवलेली समर्पण भावना आणि विकासासाठीचा ठाम निर्धार यामुळे बुलडाणा जिल्ह्याला नवा आयाम मिळाला आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात चैनसुख संचेती यांच्याबद्दल आज अभूतपूर्व विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे.
भविष्यातील विकासासाठी जिगाव प्रकल्प हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, आणि चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्हा प्रगतिपथावर अविरतपणे वाटचाल करेल, याबद्दल कुणाच्याही मनात शंका राहणार नाही.