मलकापूर : तालुक्यातील धरणगावात डिडोळ्यातील युवकाची हत्या केल्याच्या आरोपावरून गावातील एकास पोलिसांनी मृतक दिपक सोनोने शुक्रवारी रात्री अटक केली. इतर दोन संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. अटकेतील आरोपीला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शनिवारी दिला. याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. धरणगाव येथील खंडोबा मंदिरानजिकच्या खुल्या सभागृहात मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या २१ वर्षीय दीपक सुधाकर सोनोने याची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते. तसेच मृतकाचा भाऊ विजय सुधाकर सोनोने याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयितांची पोलिस चौकशी सुरू होती. घटना अतिशय विचित्र पद्धतीने घडल्यामुळे आरोपींचा शोध पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. या घटनेत बुलढाणा येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्याने मलकापूर पोलिसांनी सर्वप्रथम ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या घराकडे मोर्चा वळवला होता. त्याचबरोबर देहबोलीतून संशय बळावला. त्या अनुषंगाने पोलिसांनी स्थानिक रहिवासी अनिल राजाराम इंगळे (४८) याला शुक्रवारी उशिरा रात्री अटक केली. शनिवारी दुपारी आरोपी अनिल राजाराम इंगळे याला न्यायालयात हजर करण्यात आले. तर इतर दोघा संशयितांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.