मलकापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा व बुद्धिबळ सारख्या बौद्धिक खेळांची चढाओढ वाढत चालली आहे. अशाच स्पर्धात्मक वातावरणात मलकापूर येथील नूतन इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी प्रांजल राजेश जामोदे हिने आपली गुणवत्ता सिद्ध करत जिल्हास्तरावर यश मिळवले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्षाखालील मुलींची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत नूतन इंग्लिश स्कूलची प्रांजल राजेश जामोदे हिने सलग सहा राऊंड जिंकत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे तिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे सर, उपप्राचार्य, क्रीडा शिक्षक आकाश लटके सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रांजलचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.