Headlines

धुपेश्वर येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून; एक जखमी नऊ आरोपींवर गुन्हा दाखल; चार अटक तर पाच फरार

मलकापूर /धुपेश्वर:- येथील मंदिराजवळ किरकोळ वादातून धारदार हत्याराने तरुणाचा खून करण्यात आला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुरज सुनिल झाल्टे (वय २१ वर्षे, रा. पिंपराळा, ता. मुक्ताईनगर, जि. भुसावळ) यांच्या तक्रारीवरून कलम १०३(१), १०९, ११८(१), १८९(२)(४), १९०, १९१(१)(३) बीएनएस नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मित्र अविनाश जितेंद्र झाल्टे हा मलकापूर येथून मोटारसायकलने येत असताना झोडगा गावाजवळ टर्नवर काही युवकांशी गाडीच्या कटच्या कारणावरून वाद झाला. या युवकांनी अविनाशला चापटांनी मारहाण केली. त्यानंतर अविनाश हा धुपेश्वर पुलाजवळ येत असताना त्याच्या मागे तेच युवक आले. फिर्यादी सुरज झाल्टे व त्याचे मित्र सतीश झाल्टे, मनोहर झाल्टे, आदित्य झाल्टे, दिशांत भोलनकर हे सर्व घटनास्थळी पोहोचले असता, अविनाशने मारहाण करणाऱ्यांकडे बोट दाखवत “हेच लोक मला मारले” असे सांगितले. तेवढ्यात त्या युवकांच्या टोळीतील साहिल सुधाकर पालवे (रा. गोपाळकृष्ण नगर मलकापूर) याने “त्याला हत्याराने मार” असे सांगताच, अविनाशवर धारदार हत्याराने वार करण्यात आला. त्यावेळी सतीश गजानन झाल्टे (रा. पिंप्राळा) याने मध्ये पडून आवरण्याचा प्रयत्न केला असता, संकेत सुनील उन्हाळे (रा. गोपाळकृष्ण नगर) याने चाकूने त्याच्या पोटावर, हातावर व डोक्यावर वार केला. या हल्ल्यात सतीश गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी मलकापूर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, फिर्यादी सुरज झाल्टे यांनी हत्यार रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या डाव्या हातावर चाकूचा वार लागून ते जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, गावकऱ्यांच्या मदतीने चार आरोपी साहिल पालवे, देवसिंग ठाकुर ( सावजी फैल ), संकेत उन्हाळे आणि अरविंद उर्फ गबऱ्या सोळंके (रा. लक्ष्मी नगर) यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर उर्वरित आरोपी आदित्य वानखेडे, रुशी इंगळे, हर्षल घोंगटे, गणेश वायडे आणि कौशल घाटे हे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना अमली पदार्थांच्या नशेत असलेल्या आरोपींनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास सपोनी हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!