देऊळगावराजा : एका ३५ वर्षीय विवाहितेचा लैंगिक छळ करण्यात आला. तसेच पीडितेच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तालुक्यातील एका गावात ही घटना समोर आली आहे. गावातील घराशेजारीच राहणाऱ्यांनी हे कृत्य केले, अशी तक्रार महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीनुसार, ही महिला घरी असताना शेजारीच राहणारा आरोपी सतीश बाबासाहेब शिंदे हा तिच्या घरी आला. तिच्या पतीने तू इतक्या रात्री माझ्या घरी कशाला आला, असे विचारले. त्यावर सतीशने त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. यामुळे पीडित महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तू यातले कुठेही काही सांगितले तर तुला व तुझ्या पतीला जीवंत मारून मारून टाकील, अशी धमकी दिली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. या दरम्यान हा आवाज ऐकून गोपाळ बाबासाहेब शिंदे यानेही घरात येऊन शिवीगाळ केली. तसेच महिलेच्या छातीवर धक्का मारून तिला खाली पाडून विनयभंग केला. मात्र, महिलेने त्यांच्या तावडीतून कशी तरी सुटका केली, असे तक्रारीत नमूद आहे. तसेच सतीश शिंदे हा तीन वर्षांपासून पीडित महिलेचा लैंगिक छळ करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून देऊळगावराजा पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) नुसार 3 (1) (r), 3(1)(s), 3 (1) (w), 3 (1)(w)(i), 3 (1) (w) (ii), भारतीय न्याय संहितेच्या कलम 296(a), 296(b), 351(1),352, 64(1), 74 अन्वये गुन्हा केला आहे.
घरात घुसून पतीला मारहाण, पत्नीचा लैंगिक छळ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, देऊळगाव राजा तालुक्यातील घटना!
