मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते महाविद्यालयाच्या पॉलिटेक्निक विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई (एम.एस.बी.टी.ई.) मार्फत ‘व्हेरी गुड’ ग्रेड प्रदान करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी या महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखांचे परीक्षण बाह्य निरीक्षण समिती (एक्सटर्नल मॉनिटरिंग कमिटी) द्वारे करण्यात आले.
एम.एस.बी.टी.ई. मार्फत दरवर्षी तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्थांचे सखोल मूल्यांकन केले जाते. या मूल्यांकनात विद्याथ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक साधनसंपत्तीची उपलब्धता, प्रयोगशाळेतील उपकरणांची स्थिती, वाचनालयातील संदर्भग्रंथांची उपलब्धता, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगती, आणि व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक त्या संसाधनांची प्रभावीता या प्रमुख घटकांचा समावेश होतो. कोलते पॉलिटेक्निकच्या सर्व शाखांनी या सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी या यशाचे श्रेय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट शिक्षणासाठी कटिबद्धतेला दिले. विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धती, शिक्षकांची अथक मेहनत, आणि व्यवस्थापनाची उत्कृष्टता यामुळेच हे यश शक्य झाले आहे. महाविद्यालयाचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील उपाख्य नानासाहेब पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, आणि इतर सर्व व्यवस्थापक मंडळाने प्राचार्य, शिक्षकवर्ग, आणि विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
सर्व प्राध्यापकांनी बाह्य परीक्षणासाठी विशेष तयारी केली होती, ज्यामुळे हे यश मिळाले. महाविद्यालयाच्या या यशामुळे त्यांची तंत्रशिक्षणातील गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे, असे गौरवोद्गार संस्थेच्या व्यवस्थापनाने काढले आहेत.