मलकापूर : माता महाकाली नगरमधील वैकुठधाम स्मशानभूमिमध्ये गांजाची सर्रास विक्री होऊन त्याठिकाणी मुले व्यसन करतात. अशांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्याकडे आज २२ जुलै रोजी केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर शहरामध्ये दोन नंबरचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. पोलिसांचे त्यावर जाणिवपूर्वक नियंत्रण नाही. त्यातल्या त्यात गांजा सर्रास विकल्या जातो. यामध्ये लहान मुले ही गांजाचा नशा करतात व टोळके घेऊन फिरतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. शहरातील माता महाकालीस्थित कै. लक्ष्मण हिरू चव्हाण द्वारा संचालित वैकुंठधाम स्मशानभूमिमध्ये काही युवक गांजाचे व्यवसन करतात. त्याठिकाणी २५ ते ३० युवकांचे टोळके जमा होऊन स्मशानभूमित बसतात. अरेरावी, दादागिरी करतात. तेथील चौकीदारास अश्लील व घाणेरड्या शिविगाळ करून धमक्या देतात. बंद असलेल्या स्मशानभूमिच्या गेटचे कुलूप तोडून त्याठिकाणी दहशत निर्माण करीत आहेत. याबाबत मलकापूर शहर पो. स्टे. ला तक्रार दिली तरीसुध्दा पोलिसांनी या तक्रारीला केराची टोपली दाखविली. त्यामुळे अशा दहशत माजविणाऱ्या व गांजाचे व्यसन करून परिसरात धुमाकूळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन का गप्प आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.