मलकापूर दि.20जून 2024
मलकापूर नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा दिनांक 20 जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन स्थानिक बाजीप्रभू नगरात साजरा करण्यात आला.शिवकथाकार ऍड. योगेश पाटील हे प्रमुख मार्गदर्शक तर ता. संघचालक मा. ज्ञानदेव पाटील व मा. सहसंघचालक श्री राजेशजी महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमच्या सुरुवातीला ऍड.उत्कर्ष बक्षी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व हया प्रसंगी ऍड. योगेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले तसेच शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व विषद केले,ते म्हणाले जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता.राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे व महाराजांच्या जीवनातील विविध पैलुंचे संशोधन करण्याचे आवहान त्यांनी या प्रसंगी केले.