मलकापूर:- १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर, आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी मलकापूर शहरात देशभक्तीची अविस्मरणीय लाट उसळली. सकाळपासूनच वातावरणात “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” अशा घोषणांचा निनाद घुमू लागला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये चांडक विद्यालय आणि गोविंद विष्णू विद्यालय यांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बुलडाणा रोड येथून सुरुवात झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून निघाली आणि हुतात्मा स्मारक येथे भव्य समारोप करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हातात फडकणारे तिरंगे आणि शेकडो फूट लांबीचा राष्ट्रीय ध्वज खांद्यावर घेत देशप्रेमाचा संदेश दिला. पावसाच्या हलक्या सरींनाही न जुमानता, तरुणाईचा जोश आणि नागरिकांचा उत्साह पाहून संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले. ही तिरंगा रॅली केवळ स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने नव्हे, तर एकतेचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा संदेश देणारी ठरली. शहरवासीयांनी रॅलीवर फुलांचा वर्षाव करून सहभागींचा सन्मान केला. संपूर्ण परिसर तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघाला आणि मलकापूरच्या या देशभक्तीपूर्ण क्षणाची आठवण नागरिकांच्या मनात दीर्घकाळ कोरली जाणार आहे.