Headlines

मद्यधुंद चालकाचा कहर! स्कुटी आणि नामदार प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके यांच्या कारला मारला कट; गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : रात्रीच्या अंधारात एका मद्यधुंद चालकाने रस्त्यावर अक्षरशः थैमान घातले. भरधाव वेगाने आयशर वाहन चालवत असलेल्या या चालकाने स्कुटी आणि कारला कट दिला. विशेष म्हणजे या घटनेत नामदार प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके यांच्या कारलाही कट मारून अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
ही घटना सोमवार, दिनांक ३० जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. बुलडाण्याकडून मलकापूरकडे भरधाव वेगात येणारे एक आयशर वाहन (क्रमांक MH 28 BB 8040) चालक मद्यधुंद अवस्थेत चालवत होता. वाहनाचा वेग व बेदरकार पद्धतीने दिलेले कट यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांचे अक्षरशः जीव टांगणीला लागले होते. याच दरम्यान, राजवीर पेट्रोलपंपाजवळ आयशर वाहनाने डॉ. गोपाल डिके यांच्या कारला कट मारला. सदर कार हे स्वप्नील चांगो भंगाळे (वय ३७) चालवत होते. या अपघाताचा थरकाप उडवणारा प्रकार पाहून कारचालक स्वप्नील भंगाळे यांनी तत्काळ मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आदर्श नगर परिसरात या आयशरने एका स्कुटीला देखील कट मारल्याची माहिती समोर आली आहे. या बेफाम आणि मद्यधुंद चालकाला तहसील चौकात जागरूक नागरिकांनी थांबवत ताब्यात घेतले व पोलिसांच्या हवाली केले. ही नागरिकांची तत्परता आणि सजगता खरोखरच कौतुकास्पद आहे. घटनेची माहिती डॉ. गोपाल डिके यांनी पोलिस अधीक्षक निलेश तांबे आणि एसडीपीओ सुधीर पाटील यांना तात्काळ दिली. त्यांनी असेही नमूद केले की, अशा प्रकारच्या गंभीर घटनांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येतात आणि याविरुद्ध कडक कारवाई करणे आवश्यक आहे. पोलिसांकडून चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. दरम्यान, शहरात मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!