मलकापूर ( दिपक इटणारे )मलकापूर शहरात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी कायदा, शिस्त आणि पोलिसांची भीती झुगारून खुलेआम दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ‘आरिफ डॉन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युवकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापत गुंडगिरीचं प्रदर्शन केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तो हातात तलवार घेऊन उभा असलेला, गराड्यात तरुणांची गर्दी असलेली ही दृश्यं पाहून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, मात्र गर्दीचा फायदा घेत आरिफ नावाचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तरुण पसार झाला. पोलिसांशी हुज्जत घालणारे काही समर्थकही उपस्थित होते. ही संपूर्ण घटना पोलिसांसाठी एक आव्हान ठरली होती. पण मलकापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गिरी यांनी ही घटना केवळ एक वाढदिवस नव्हे, तर शहराच्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न मानून या गुन्हेगाराचा शोध सुरू केला. ‘गिरी स्टाईल’ने कामगिरी करत अवघ्या दोन दिवसांत डॉनच्या नावाने मिरवणाऱ्या आरिफला पकडण्यात आलं आणि शहरातून त्याची धिंड काढण्यात आली. गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखालील टीमने आरिफला अटक केल्यानंतर फक्त कायदेशीर कारवाई केली नाही, तर त्याची धिंड काढून जनतेसमोर त्याचं खोटं ‘डॉनगिरीचं’ रूप फोडलं. शिस्तीचा, कायद्याचा आणि न्यायव्यवस्थेचा हा मजबूत संदेश सध्या मलकापूरात गाजतो आहे.
“शहरात पोलीसच डॉन आहेत, दुसरा तिसरा नाही,” असा ठणठणीत इशाराच पोलिसांनी या कारवाईतून दिला. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, अनेकांनी पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांचं कौतुक करत सामाजिक माध्यमांवर त्यांच्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.