मलकापूर ( दिपक इटणारे ) –”काल विष्णूनगर, आज आळंद… उद्या कुठे?” शेतकऱ्यांचे डोळे झोपेच्या आधी आकाशाकडे, आणि पाय मातीतल्या कपाटाकडे – कारण रात्री कुठून हल्ला होईल, याची खात्री उरलेली नाही…
विष्णूनगर शिवारातील बिबट्याच्या थरारक हल्ल्याची चर्चा थांबायच्या आतच तोच बिबट्या आता मलकापूर तालुक्यातील आळंद शेत शिवारात दिसल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्याचे अस्तित्व पुन्हा एकदा स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले असून, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
गेल्या सोमवारी विष्णूनगर शिवारात रोही जातीच्या जनावरावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. अतुल पाटील यांच्या शेतात मध्यरात्री घडलेल्या त्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती वनविभागाला वेळेत देण्यात आली नव्हती आणि त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याच्या हालचाली उशिराच सुरू झाल्या. आता त्याच बिबट्याने आळंद शिवारात प्रवेश केल्याने भीतीचा कळस गाठला आहे. या घटनांमुळे शेतकरी आणि परिसरातील नागरिक सतत भयग्रस्त अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी शेतात जाणं टाळावं लागत असून, शाळकरी मुलांना आणि महिलांना सुद्धा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा वनविभागावर नाराजी व्यक्त केली असून, तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे. तसेच, नागरिकांनी सावध राहून कुठलाही संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे.