मलकापूर –”शेतात पिकं नाही, तर आता सुरक्षितताही नाही… रात्रीच्या अंधारात गोंधळलेल्या जनावरांच्या किंकाळ्यांमुळे शेतात काम करणाऱ्यांचं काळीज हादरून गेलं!”
मलकापूर शहरालगत असलेल्या विष्णूनगर शिवारातील एका शेतात सोमवारी मध्यरात्री हृदयद्रावक घटना घडली. अतुल पाटील (मालक – अन्नपूर्णा हॉटेल) यांच्या शेतात बिबट्याने अचानक प्रवेश करत रोही जातीच्या जनावरावर हल्ला चढवला. या झपाट्याने झालेल्या हल्ल्यात जनावराचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे.
ही घटना शेतात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केली असून, सदर व्हिडीओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बिबट्याच्या हालचाली आणि थरारक हल्ला स्पष्टपणे दिसून येत असल्याने ही घटना अधिकच गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे अजूनपर्यंत वनविभागाला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे बिबट्या मोकाट फिरत असल्याची भीती स्थानिकांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वनविभागाने तातडीने लक्ष घालावे, पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी जोरदार मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी कोणीही एकटे बाहेर पडू नये, काळजी घ्यावी, असा इशाराही परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.