मलकापुर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 13 हजार रुपये दंड अशी शिक्षा दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी मलकापूर येथील विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही जाधव यांनी आरोपीस सुनावली आहे.
याबाबत हकीकत अशी आहे की, अल्पवयीन मतिमंद पिडीत मुलगी ही शौचालयासाठी जात असताना आरोपी सुरेश भगवान संबारे रा. बेलाड याने हात पकडून खोपडीत नेऊन अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केला त्या प्रकरणी पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे पीडीतेच्या आईने दिलेल्या रिपोर्ट वरून अपराध क्रमांक 124 /2022 कलम 354 अ, 354 ब , 354 ड, 376 , ३७६ 2 एन , ३७६ फ , 376 3, 363, 366 , ५०६ भारतीय दंड विधान सहकलम 4, 5,,6,8,10,12 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 सह कलम, 92ब, 95 दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 नुसार दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करून तपासा अंती दोषारोपपत्र विद्यमान विशेष न्यायाधीश यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर प्रकरण आरोपी विरुद्ध स्पेशल केस नंबर 16/22 नुसार चालवण्यात आले. आरोपी हा अटकेपासून कारागुहात होता.
सरकार पक्षातर्फे एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी पिडीता, डॉक्टर, पीडितेची आई, तपास अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी सुरेश भगवान संबारे याचे विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने विद्यमान न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड शैलेश हरिहर जोशी विशेष सरकारी अभियोक्ता यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुरेश भगवान संबारे यास पोक्सो कायद्याचे कलम 6 नुसार 20 वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड न भरल्यास, 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा, कलम 4 नुसार 10 वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम 10 नुसार 5 वर्षे शिक्षा 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा कलम 12 नुसार दोन वर्षे शिक्षा व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची एकूण रक्कम 13 हजार रुपये आरोपीकडून वसूल करून पीडितेस देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने दिला आहे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांना पीडित नुकसान भरपाई योजनेअंतर्गत अतिरिक्त नुकसान भरपाई ठरवुन पिडीतेस देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने दिला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गंगाराम ठाकरे यांनी केला पैरवी अधिकारी म्हणून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संतोष भिकाजी कोल्हे पोलीस स्टेशन मलकापूर शहर यांनी काम पाहिले.