Headlines

समृद्धी महामार्गावर थार कारचा भीषण अपघात; एक ठार, तिघे जखमी

डोणगाव :- प्रयागराजहून मुंबईकडे परतणाऱ्या महिंद्रा थार कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी कार ट्रकवर धडकल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातात आणखी दोघांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

ही दुर्घटना मंगळवारी सकाळी १० वाजता डोणगाव शिवारातील मुंबई कॉरिडोर चॅनेल क्रमांक २८८.८ जवळ घडली. प्रयागराज येथून महिंद्रा थार (जीजे-०१-डब्ल्यूपी-१६६१) मधून चारजण मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, समोरून जात असलेल्या ट्रकच्या (एमएच-१२-एनएक्स-३१९३) चालकाने अचानक ब्रेक लावल्याने कार ट्रकवर जाऊन आदळली. या धडकेत कारचे समोरील टायर तुटून बाजूच्या बॅरियरवर जाऊन आपटले.
अपघातात हेमल जगदीश मेहता (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. आलिशा सिन्हा (२६) हिचा डावा हात मोडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. श्रद्धा सिन्हा (२५) आणि चालक शशिकांत लालचंद विश्वकर्मा (३४) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वजण मुंबईतील घाटकोपर, पंतनगर येथील रहिवासी आहेत.
या अपघातानंतर जखमींना तातडीने मेहकरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!