मलकापूर, १९ डिसेंबर: दळाचा मारोती शिवारात शेतातील उभ्या तुरीच्या पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे एक एकर तुरीचे पीक पूर्णतः जळून खाक झाले असून, शेतकऱ्यांना २५ ते ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.प्राप्त माहितीनुसार, शेतकरी अशोक सूर्यवंशी (पाटील) आणि प्रकाश सूर्यवंशी (पाटील) यांच्या शेतातील उभ्या तुरीच्या पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावली. ही आग अशोक सूर्यवंशी यांच्या शेतातून पसरून प्रकाश सूर्यवंशी यांच्या शेतातील तुरीच्या दोन सऱ्यांपर्यंत पोहोचली.या घटनेत अशोक सूर्यवंशी यांच्या एक एकर शेतातील तुरीचे पीक पूर्णतः जळून गेले. तसेच प्रकाश सूर्यवंशी यांच्या शेतातील तुरीच्या दोन सऱ्यांवरही आगीचा प्रचंड फटका बसला.या घटनेमुळे दोन्ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, अशोक सूर्यवंशी यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.