मलकापूर: वीटभट्टी मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची लाच घेताना मध्यप्रदेशातील लालबाग पोलीस ठाण्यात कार्यरत हेडकॉन्स्टेबल पवन शर्मा याला इंदोर लोकायुक्त पथकाने रंगेहात अटक केली. या प्रकरणात हेडकॉन्स्टेबल दयाराम सिलवेकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर येथील वीटभट्टी मालक अभिजीत मास्कर यांनी नेपानगर येथून ठेकेदार इरफानच्या माध्यमातून मजूर आणले होते. या मजुरांना एक वर्षापूर्वी ५० हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते. मात्र, मजूर कामावर हजर झाले नाहीत. अभिजीत यांनी ठेकेदार इरफानकडे पैसे मागितले, मात्र पैसे न मिळाल्याने इरफानने एका मजुराची दुचाकी ताब्यात घेतली.
दुचाकी ताब्यात घेतल्याच्या कारणावरून संबंधित मजुराने नेपानगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे दयाराम सिलवेकर यांनी अभिजीत मास्कर यांना आरोपी बनविण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची मागणी केली. लाच मागणीने त्रस्त झालेल्या अभिजीत मास्कर यांनी इंदोर लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली. लोकायुक्त पथकाने बऱ्हाणपूर येथे सापळा रचून ५ डिसेंबर रोजी सुर्यम रेसिडेन्सीजवळ पवन शर्मा याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या प्रकरणात पवन शर्मा व दयाराम सिलवेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.