मलकापूर ( उमेश ईटणारे ) बुलढाणा रोडवरील बगाडे रेडियम समोर असलेली जलवाहिनी महिनाभरापासून फुटलेली आहे, ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली गेली असताना, एक महिना उलटूनही यावर कोणतीही दुरुस्ती केली गेलेली नाही. या गंभीर लापरवाहीमुळे जलवाहिनी मधून होणारा पाण्याचा अपव्यय नागरिकांसाठी चिंता आणि असंतोषाचा कारण बनला आहे.
शहरात पाणीपुरवठा दहा दिवसांनी होत असताना, अशा परिस्थितीत लाखो लिटर पाणी वाया जात असताना तात्काळ दुरुस्तीची कोणतीही ठोस उपाययोजना नगरपालिकेने केली नाही. यामुळे पालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता अनेक दिवस वाट पाहावी लागते, तर दुसरीकडे जलवाहिनीतील लीकमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा अनिर्णित असताना, अशा गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करणे पालिका प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे आणि बेजबाबदारपणाचे प्रतीक ठरते.