मलकापूर( उमेश इटणारे ) :- मलकापूरमधील पारपेठ भागात काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश एकडे यांच्या “विकास रथ” प्रचार रॅलीला अनपेक्षितपणे प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला आहे. रॅलीच्या दरम्यान संतप्त मुस्लिम महिलांनी थेट रथाजवळ जाऊन आपला तीव्र रोष व्यक्त केला. महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पाच वर्षांच्या अपयशावर महिलांचा राग
“पाच वर्षांत आम्हाला फक्त खोटी आश्वासनं मिळाली, प्रत्यक्षात एकही विकास काम दिसलं नाही,” असा थेट आरोप महिलांनी आमदारांवर केला. महिलांनी विकास रथाला नुसते विरोधच नाही, तर त्याला खोटारडेगिरीचं प्रतीक ठरवलं. स्थानिक नागरिकांच्या मते, आमदार एकडे यांनी निवडून आल्यावर पारपेठसह अनेक भागांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
महिलांना शांत करण्याचा नगरसेवकांनी प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला. संतप्त महिलांनी “मत मागण्याआधी केलेल्या वचनांची जबाबदारी घ्या” असा आव्हानात्मक सवाल विचारला. या प्रकारामुळे काँग्रेसची प्रतिमा आणखी गडगडत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकेचा भडिमार होत आहे. विरोधकांनी या प्रसंगाचा फायदा घेत काँग्रेसच्या अपयशावर जोरदार हल्ला चढवला आहे.
विरोधी पक्षांनी या घटनेला भांडवल बनवत काँग्रेसला धारेवर धरले आहे. “लोकांची फसवणूक करणे, निवडणुकीच्या तोंडावर खोटे आश्वासन देणे हेच काँग्रेसचे काम आहे,” असे आरोप विरोधकांनी केले आहेत. या घटनेनंतर मुस्लिम समाज काँग्रेसपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजेश एकडे आणि काँग्रेस पक्षाला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. प्रचार रॅलीतून ज्या प्रकारे महिलांनी संताप व्यक्त केला, त्यावरून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला कडवे आव्हान उभे राहील, हे निश्चित आहे. विकासाच्या नावाने मत मागणाऱ्या काँग्रेसची पोलखोल झाली असून, या प्रकरणाने त्यांच्या निवडणुकीच्या संधींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.