मलकापूर( उमेश इटणारे ): तालुक्यातील भाडगणी गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, महिना उलटूनही या समस्येवर तोडगा न लागल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाडगणी गावात तीनशे ते चारशे घरं असून, गावातील लोकसंख्या चार ते पाच हजारांच्या आसपास आहे. या गावात अनेक शेतकरी असून, शेतातील कामांसाठी आवश्यक असलेले पाणीही उपलब्ध नाही. परिणामी, शेतकऱ्यांना विहिरीतील पाण्याने तहान भागवावी लागते.गावातील पाणी पुरवठा अत्यंत गंभीर झाल्याने ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांनी आवाज उठवला आहे. महिना उलटूनही या समस्येवर कोणताही उपाय न लागल्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
सरपंच अतुल खोडके यांचे स्पष्टीकरण:
या संदर्भात विदर्भ लाईव्हने ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल खोडके यांच्याशी संपर्क साधला. सरपंच खोडके यांनी सांगितले, “भाडगणी गावाच्या ग्रामपंचायतीवर महावितरण कंपनीचे चार ते पाच लाख रुपयांचे विजबिल थकलेले आहे. यामुळे वारंवार वीज कटींग होत आहे आणि त्यातच पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. आम्ही लवकरच महावितरणच्या थकलेल्या बिलाची भरणा प्रक्रिया पूर्ण करून, गावकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवू. त्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलत आहोत,” असे ते म्हणाले.
गावकऱ्यांना आशा आहे की लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल.