मलकापूर पांग्रा, बुलढाणा: समृद्धी महामार्गावर एका भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना ३१ ऑक्टोबर रोजी मलकापूर पांग्राजवळ घडली.
मृतांमध्ये राजेश दाभाडे (वय ४२), शुभांगी दाभाडे (वय ३२) आणि रियांश राजेश दाभाडे (वय ४) यांचा समावेश आहे. पुणे येथील राजेश दाभाडे यांचे कुटुंब कार क्रमांक एमएच १७ एजे ९१७३ ने अमरावतीकडे जात असताना, समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ३३४.६०० नागपूर कॉरिडॉर येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरील ट्रक क्रमांक एमएच २१ बीएच ५९७६ वर जोरात आदळली.
धडक इतकी भीषण होती की, शुभांगी व राजेश दाभाडे यांचा जागीच मृत्यू झाला. रियांश या चिमुकल्याला सिंदखेड राजा येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
अपघातात कारमधील समीक्षा दाभाडे व चालक आश्विन धनवरकर किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून प्राथमिक उपचार देण्यात आले. ट्रक चालक खाजा शेख (रा. जालना) याला सिंदखेड राजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमींना सिंदखेड राजा आणि दूसरबीड येथे १०८ रुग्णवाहिकेतून डॉक्टरांनी उपचारासाठी हलवले. या वेळी पोलीस आणि स्थानिक कर्मचाऱ्यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला.
दाभाडे कुटुंबावर शोककळा
दिवाळीच्या सणात दाभाडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या अपघातात पाच वर्षीय समीक्षा दाभाडे हिचा जीव वाचला आहे, मात्र तिच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.