खामगाव: तालुक्यातील २१ वर्षीय महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ जानेवारी ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत घडल्याचे पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारदार महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, तिचे घटस्फोटाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून तिचा अजय विजय तायडे (रा. नांदुरा) याच्याशी प्रेमसंबंध होता. दरम्यान, अजय तायडे याने तिच्या मोबाईलमधील खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच दारूच्या नशेत तिला मारहाण केली.
या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अजय विजय तायडे याच्या विरोधात भारतीय दंड संहिता बीएनएस अंतर्गत कलम १३७(२), ८७, ६४(२)(एम), ११५(२), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.