मलकापूर ( उमेश ईटणारे ): – शहरातील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम असून नागरिकांना पाणीपुरवठा कधी होईल याची कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे अनेक नागरिकांचे पाणी भरणे राहून जाते. याउलट, अगदी जवळ असलेल्या वाकोडी ग्रामपंचायतीने सुयोग्य नियोजन करून नागरिकांसाठी सोयीस्कर पद्धतीने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
वाकोडी ग्रामपंचायतीचा नियोजनबद्ध पाणीपुरवठा
वाकोडी ग्रामपंचायत नियमित चार दिवसांवर पाणीपुरवठा करते आणि पाणी सोडण्याच्या आधी नागरिकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाते. त्यामुळे तेथील नागरिकांना कोणतीही अडचण येत नाही. ही योजना यशस्वी ठरली असून नगरपालिकेनेही यापासून आदर्श घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
नगरपालिकेच्या नियोजनाचा अभाव, नागरिकांचा रोष
मलकापूर शहरात दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असला तरी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे लोकांना अचानक धावपळ करावी लागते. इतक्या मोठ्या शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन एकदम ढिसाळ आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरपालिकेने वाकोडीचा आदर्श घ्यावा!
शहरातील पाणीपुरवठ्याचा गोंधळ आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा पाहता, नगरपालिकेने वाकोडी ग्रामपंचायतीकडून शिकण्याची गरज आहे.
नागरिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी नगरपालिकेने एसएमएस किंवा इतर माध्यमातून माहिती द्यावी. जर ग्रामपंचायतीकडून हे शक्य होत असेल, तर नगरपालिकेनेही तातडीने असे नियोजन करावे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल.
नगरपालिकेने आता तरी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी का ? की नागरिकांचे हाल सुरूच राहणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.