मलकापूर :- बसस्थानकाजवळ एका क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. “तू माझ्याकडे काय बघतो” या कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला जाऊन हाणामारीत बदलला. या घटनेत दोघे जखमी झाले असून शहरात काही काळ दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आटोक्यात आली. ही घटना काल रात्री 10.15 च्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, बसस्थानकासमोरील एका दुकानाजवळ दोन्ही गटातील काही तरुण उभे होते. परस्परांकडे पाहण्यावरून सुरू झालेल्या वादाचे स्वरूप हाणामारीत बदलले. यावेळी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही, पारपेठ भागातील 100 ते 200 तरुण लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉड घेऊन शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत कुलमखेळ भागात घुसण्याचा प्रयत्न करीत होते.
शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना माहिती दिली. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गिरी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी त्वरित धाव घेतली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे पारपेठ भागातील अनेक तरुण पळून गेले. गांधी चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर अधीक्षक अशोक थोरात मलकापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. ते काही तास तळ ठोकून बसले होते. या दरम्यान पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले असून, घटनेचा तपास सुरू आहे. यावेळी अप्पर अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गिरी, पोलीस निरीक्षक संदीप काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक करूणाशील तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गी, उपनिरीक्षक सुरेश रोकडे, डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी व आरसीपी पथकाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दक्षता बाळगली. या प्रकरणी धीरज पाटील व वसीम मेमन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस निरीक्षक गणेश गिरी व त्यांच्या टीमने दाखवलेल्या तत्परतेमुळे शहराची शांतता पुन्हा प्रस्थापित होण्यास मदत झाली.