मलकापूर – रेल्वे स्टेशनवर गाडी आली असता पाणी घेऊन पुन्हा गाडीत चढणाऱ्या प्रवाशाचा पाय घसरून तो रेल्वे व प्लॅटफार्मच्या मधात अडकला असता त्याला आरपीएफ पोलिसांनी प्रसंगावधान राखीत बाहेर काढून त्याचे प्राण वाचविल्याची घटना २१ जून रोजी रात्री ८.३५ वा. दरम्यान घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, २१ जून रोजी रात्री ८.३५ वा. दरम्यान टाटानगर – मुंबई रेल्वेगाडी प्लॅटफार्म क्र. १ वर आली असता प्रवासी एम.डी.जाहीद (वय ३४) रा. टाटानगर जमशेदपूर हे पाणी घेण्यासाठी उतरले. पाणी घेऊन जात असतांना गाडी सुरू झाल्याने त्यांनी चालू गाडी पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांचा हात सटकून ते रेल्वेगाडी व प्लॅटफार्मच्यामध्ये लटकत होते. ही बाब त्याठिकाणी ड्युटीवर असलेले आरपीएफ सहायक उपनिरीक्षक विरपाल व सहायक उपनिरीक्षक तांगर यांनी त्या प्रवाशाकडे धाव घेत जिवाची पर्वा न करता त्याला बाहेर ओढले. यामध्ये प्रवाशाच्या पायाला, कंबरेला जखमा झाल्या असल्यातरी पुढील अनर्थ टळला. आरपीएफ जवानांकडून केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.