Headlines

इंजिनिअरिंग करताय? मंग हे अवश्य वाचा.!

 

सोळा ते अठरा वर्षाच्या वयात महाविद्यालयाच्या दिशेने टाकलेलं एक छोटसं पाऊल आपल्या आयुष्यची दिशा ठरवते. या वयात आपल्या मनात काहीशी हुरहूर, भीती, आत्मीयता आणि उंच झेप घेण्याची जिद्द असते. ही झेप घेण्यासाठी पंखामध्ये लागणारं बळ पुरवण्याचं काम आई-वडीलापेक्षा शिक्षकाचं काकणभर नक्कीच जास्त असते. खरं म्हणजे दहावी किंवा बारावी पास मुलांचं हे कोवळ वय म्हणजे त्यांना समजण्याची किंवा बिघडण्याचं वय म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. नेमकं याच वेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची गरज असते.

या वयात आई-वडिलांच्या देखरेखीखाली वाढलेली मुलं निश्चितच काहीतरी चांगलं करतात. ग्रामीण भागाचा युवक मोठ्या शहरातील महाविद्यालयांच्या जाहिरातीला बळी पडून प्रवेश घेतो. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी वृत्तपत्रात झळकणाऱ्या भल्या मोठ्या जाहिरातींचे पालक व विद्यार्थ्यांना जास्त आकर्षण वाटू लागले आहे. मोठमोठ्या नावाजलेल्या कॉलेजमधून अथवा मोठमोठ्या शहरातील कॉलेजमध्ये शिकूनच यशस्वी इंजिनीअर होता येते असा अनेकांचा गैरसमज आहे.

मोठ्या शहरात राहण्या-खाण्याचा आणि दळणवळणाचा, शैक्षणिक शुल्काचा खर्च तुलनात्मकरित्या खुप जास्त असल्याने तेथील कॉलेज खर्चिक असतात. याउलट पायाभूत सुविधा उपलब्ध असलेली लहान शहरातील कॉलेज मोठ्या शहरांपेक्षा साधारणपणे जास्त परवडणारे असतात. मोठमोठी कॉलेज जाहिरातीमध्ये आम्ही प्लेसमेंट करतो असे दाखवून दिशाभूलही करतांना आढळून येतात. खरे पाहिल्यास ६० विद्यार्थीसंख्या असलेल्या वर्गात फक्त आठ ते दहा मुलांना प्लेसमेंट मिळतं आणि बाकीच्यांना निराशा पदरी पडते. या सर्व गोष्टी करताना फी म्हणून अमाप पैसा घेतला जातो.

मोठ्या शहरातील कॉलेजमधील शिक्षक क्लास झाल्यावर अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्या व्यस्ततेमुळे उपलब्ध नसतात. या कॉलेजच्या प्रिन्सिपलला साधे भेटणे पण शक्य नसते. उलट लहान शहरातील कॉलेजमधील उच्चशिक्षित शिक्षक केव्हाही उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकेचे निराकरण ग्रामीण भागात लवकर आणि व्यवस्थित होते. भारताच्या छोट्या शहरातील कॉलेजांनी शून्यातून विश्व निर्माण करणारे असंख्य उद्योग महर्षी, संशोधक शास्त्रज्ञ निर्माण करून अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना कुशल कर्मचारी पुरवत जगापुढे आदर्श निर्माण केले आहेत.

लहान महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळू शकते का? असा विचार मनात येतो. त्याचे उत्तर आहे हो! ज्ञान, समर्पण आणि मेहनत असल्यास ते अवघड नाहीच. भारतात ७०% लोक खेड्यात राहतात, खरे पाहिल्यास खरी गुणवत्ता, दमदार विद्यार्थी खेड्यापाड्यातच आहे. हि गुणवत्ता सामावून घेण्यासाठी अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आवर्जून ग्रामीण भागात आणि लहान शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्येपण कॅम्पससाठी येतात.

भारतातील अनेक मोठी शहरे एज्युकेशन हब बनण्यापेक्षा इंडस्ट्री बनत चालली असून ही शहरे स्पर्धा आणि पैशाचे गणित वाढवत विद्यार्थ्यांच्या जीवावर उठत आहे. मोठ्या शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये शिकतांना त्या बरेचदा ग्रामीण विद्यार्थ्यांचे शहरातल्या चमकदमकला बळी पडून मॉल, सिनेमा, नाईटलाईफ अशा शहरी गोष्टीत न कळत गुंफून जाऊन आपला प्रमुख उद्देश असलेल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो. कॉलेजमधील शहरी परंपरा जपणाऱ्या इतर मॉडर्न मुलांशी जुळवून घेणे कठीण जात असल्याने गावातून गेलेली मुले आपल्याला न समजलेल्या किंवा कठीण असलेल्या गोष्टी बोलून मन मोकळे करण्यापेक्षा आतल्या आत घुसमटत राहतात. त्यांनी शहरी मुलांशी जुळवून घेतले तरीही बरेचदा त्यातील मित्र-मैत्रिणींचे टोळके अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर अनावश्यक कामेच जास्त करत असतात त्यामुळे तशी एक वेगळी संस्कृती तयार झालेली आहे. या मुलांमध्ये राहिल्यानंतर बऱ्याच मुलांमध्ये न्यून भावना निर्माण होऊन त्याचा परिणाम त्याच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर होत असतो. मोठमोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावरही अचानक आलेल्या अभ्यासाचे दडपण, नवीन ठिकाणी ओळखीअभावी मित्रमैत्रिणी नसल्याने आलेल्या दडपणाचे ओझे, पालकांची अपेक्षा तोलवल्या न गेल्याने अनुत्तीर्ण होण्याचे तर कुठे आत्मविश्वास व भावविश्व उध्वस्त झाल्याने आलेली निराशा व टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाणही वाढत आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही.

मोठमोठाल्या कोलेजमध्ये शिकूनच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते का? याचा विचार प्रत्येक पालकाने करणे भाग आहे. बरेचदा आपल्या मुलाला मोठ्या शहरातिल कॉलेजमध्ये प्रवेश देऊन मोजक्या उत्पन्नातून कॉलेजची भरमसाठ फी, हॉस्टेलचा खर्च, मेस आणि इतर खर्च भागवता भागवता नाकी नऊ येतात.

लहान शहरातील कॉलेजमध्येसुद्धा विद्यार्थ्यांमधील ज्ञानशलाकांना तेजान्वीत करून त्यांचे जीवनविश्व प्रकाशमय करणारे अनेक शिक्षक कार्यरत आहेत. इंजिनीअरिंग किंवा तत्सम शिक्षण घराजवळ शिकत असला तर ड्रायव्हिंग, लाईट फिटिंग, गाड्या दुरुस्ती सारखी छोटी मोठी कामे शिकता येतील अनेक विद्यार्थी शेती करता करता प्रत्यक्ष फिल्डच्या संपर्कात आल्याने मोठमोठे तंत्रज्ञ बनले आहेत. घराच्या जवळच राहून शिकल्यास सत्य परिस्थितीची जाणीव राहते. स्किल आणि अनुभव सोबत घेता येतात, म्हणून पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो वरील सर्व गोष्टींची सारासार विचार करूनच इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करा.

….*पंकज वसंत पाटील*
मलकापूर जि.बुलढाणा
मो.9850430579

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *