मलकापूर: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या मेकॅनिकल विभागाने विद्यार्थ्यांना उद्योगातील व्यावसायिक ज्ञान मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तीन प्रमुख उद्योगांना भेट दिली. विद्यार्थ्यांनी प्रथम भेट दिली आयजीटीआर छत्रपती संभाजीनगर येथे श्री. अनिकेत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उद्योगातील वास्तविक उत्पादन प्रक्रियेची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना डिझाईनपासून अंतिम उत्पादनापर्यंतच्या सर्व टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. तसेच, उत्पादन प्रक्रिया कशी नियोजित केली जाते आणि उद्योगात वेळेचे व्यवस्थापन कसे केले जाते याबद्दल मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष कामकाज समजले आणि त्यांचे तांत्रिक ज्ञान अधिक मजबूत झाले.यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुकृपा इंजिनिअरिंग या उद्योगाला भेट दिली. येथे श्री. एस. एस. सरदार आणि श्री. पी. एस. सरदार यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप कसे सुरू करावे, त्याची योजना कशी करावी, आणि उद्योग चालवताना कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या चर्चेत विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे महत्त्व आणि त्यासाठी लागणाऱ्या तयारीबद्दल मोलाचे मार्गदर्शन मिळाले.तिसरी भेट लक्ष्मी ग्रुप या उद्योगाला दिली गेली, जिथे विद्यार्थ्यांनी उत्पादनाच्या विविध विभागांची माहिती घेतली. लक्ष्मी ग्रुपमधील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योग कसे कार्य करतात हे प्रत्यक्ष पाहता आले.
या औद्योगिक भेटीतून विद्यार्थ्यांना उद्योगाच्या व्यावहारिक पैलूंशी परिचय झाला, तसेच उद्योजकता आणि उद्योगातील सध्याच्या ट्रेंड्सबद्दल सखोल ज्ञान मिळाले. ही भेट यशस्वी होण्यासाठी प्रा. संतोष शेकोकार यांनी योग्य नियोजन केले, तर महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक खरात प्रा ए आर गोळे यांनी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या सततच्या सहकार्यामुळे ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरली. अशा प्रकारच्या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगाची समज प्राप्त होते आणि त्यांचे कौशल्य प्रात्यक्षिक अनुभवांच्या आधारे अधिक विकसित होइल, असे वक्तव्य महाविद्यालयाचे सचिव श्री पराग पाटील व डॉ गौरव कोलते यांनी यावेळी केले