मलकापूर:- २३ जुलै २०२४ रोजी पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यावर जनजागृतीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे येथील जिल्हा कार्याअध्यक्ष श्री अशोक वानखडे व डोंबिवली येथील अनिस चे कार्यकर्ते श्री राजेंद्र कोळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या महत्त्वावर भाष्य केले.
अशोक वानखडे व राजेंद्र कोळी यांनी आपल्या भाषणात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची गरज आणि त्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले आणि अंधश्रद्धा कशाप्रकारे समाजाच्या प्रगतीत अडथळा आणते हे स्पष्ट केले.त्यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेवर मार्गदर्शन केले तसेच काही प्रात्यक्षिके करून दाखवली. कार्यक्रमात अंधश्रद्धेवर आधारित प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यात विद्यार्थ्यांनी आपल्या शंका आणि विचार व्यक्त केले. उपस्थित तज्ञांनी त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.कार्यक्रमाच्या शेवटी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि त्यांच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन कौतुकास्पद रीतीने केले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मार्गावर हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे कोलते इंजीनियरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. संदीप खाचणे, प्रा पराग चोपडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा सचिन बोरले, प्रा रमाकांत चौधरी,प्रा मनोज वानखडे,प्रा अमोल तांबे हे उपस्थित होते.