“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे” या उक्तीचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री. ज्ञानदेव निनू पाटील उर्फ नानासाहेब पाटील. कष्ट, ध्येय आणि असीम परिश्रमाच्या जोरावर उद्योग आणि समाजसेवा क्षेत्रात यशस्वीपणे आपली ओळख निर्माण करणारे नानासाहेब पाटील हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. विदर्भातील तांदुलवाडी या छोट्याशा गावात २८ ऑगस्ट १९४६ रोजी जन्मलेल्या नानासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने अवघ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली आहे.
*शिक्षणाची सुरुवात*
नानासाहेब पाटील यांचे शिक्षण मलकापूरमध्ये झाले. प्राथमिक शिक्षण म्युनिसिपल हायस्कूल आणि सरकारी शाळेत पूर्ण केल्यानंतर त्यांनी ९वी व १०वीचे शिक्षण आदर्श शाळा, मलकापूरमध्ये घेतले. यानंतर ११वी ते इंटरसायन्स पर्यंतचे शिक्षण नागपूरच्या प्रतिष्ठित हिसलाप कॉलेजमध्ये झाले. शिक्षणात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या नानासाहेबांनी आपले करिअर नोकरीत नव्हे, तर उद्योगात घडविण्याचे ठरवले.
*उद्योगाची सुरुवात आणि यशाचा शिखर*
१९६४ साली, नानासाहेबांनी मलकापूरमध्ये ‘निनू आनंदा पाटील होलसेल किराणा दुकान’ या नावाने आपल्या उद्योग प्रवासाची सुरुवात केली. या छोट्या सुरुवातीतून पुढे मोठ्या यशाचा पाया रचला गेला. काही वर्षांतच त्यांनी स्कॉटलॅंड ग्वालियर यांच्या विकीमोपेड मिनी मोटारसायकलची एजंसी घेतली, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार झाला.
१९७० मध्ये, होलसेल किराणा दुकान बंद करून नानासाहेबांनी एस्कॉर्ट लिमिटेडच्या ट्रॅक्टरची एजंसी घेतली. हे पाऊल त्यांच्या यशस्वी उद्योग प्रवासातला महत्त्वाचा टप्पा ठरला. नानासाहेबांनी कृषी केंद्र फर्मही स्थापन केली, ज्यामध्ये त्यांच्या बंधूंनीही मोलाची भूमिका बजावली. १९७८ मध्ये त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा, मलकापूरच्या माध्यमातून एकाच दिवशी १०१ ट्रॅक्टरचे वितरण केले, हे त्यांच्या उद्योजकीय कारकिर्दीतले एक मोठे यश आहे. या अनोख्या कामगिरीसाठी कंपनीचे आणि बँकेचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
*उत्तरोत्तर प्रगती आणि विस्तार*
नानासाहेबांचे उद्योग विविध जिल्ह्यांमध्ये पसरले. अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, आणि मलकापूरसह पाच जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली. १९७६ मध्ये त्यांनी गजेंद्र फॅब्रिकेशन या नावाने ट्रॉली व शेती उपयोगी अवजारे बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. यामुळे ट्रॅक्टरच्या मागणीसह ट्रॉलीच्या मागणीचीही मोठी वाढ झाली. व्यवसायाच्या वाढत्या मागणीनुसार, नानासाहेबांनी ‘लकी ट्रॅक्टर’, ‘कौशिक ट्रॅक्टर’, आणि ‘राधाकृष्ण ट्रॅक्टर’ या नावाने फर्म सुरु केल्या. त्यांच्या या सर्व उद्योगात एकूण ३०० कर्मचारी कार्यरत होते, ज्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला.
१९८४ मध्ये, नानासाहेबांनी ‘कृषी केंद्र इंपेरिअर’ ही फर्म सुरु केली, ज्यामध्ये राधाकृष्ण ट्रॉली फॅक्ट्रीही सुरु करण्यात आली. त्यांनी ट्रॉली आणि स्पेअर पार्ट्सचा व्यापारही मोठ्या प्रमाणात केला. १९८२ मध्ये एस्कॉर्ट कंपनीमार्फत उत्कृष्ट विक्रीसाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. १९९५ साली त्यांनी ५१ ट्रॅक्टर आणि ट्रॉली एका शुगर फॅक्टरीला वितरित केले, हे त्यांच्या उद्योजकीय कारकिर्दीतील आणखी एक मोठे यश आहे.
*सामाजिक बांधिलकी आणि समाजकार्य*
नानासाहेब पाटील यांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी होताना सामाजिक उत्तरदायित्वही ओळखले. व्यवसायातील दैनंदिन आर्थिक व्यवहार मोठे असल्यामुळे आणि ३०० कर्मचार्यांच्या वेतनाची जबाबदारी असल्यामुळे, नानासाहेबांनी ‘राधाकृष्ण नागरी पतसंस्था’ सुरु केली. आज ही संस्था ६० कोटी रुपयांचे भांडवल असलेल्या बँकेमध्ये परिवर्तीत झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय नानासाहेब त्यांच्या एकत्र कुटुंबातील मेहनतीला देतात.
१९९२ पासून पुणे येथे बांधकाम व्यवसायात उतरत, नानासाहेबांनी ‘डिएनव्ही कंपनी’ नावाने एक प्रतिष्ठित कंपनी सुरु केली. व्यवसायाबरोबरच त्यांनी समाजासाठी केलेले योगदानही लक्षणीय आहे. १९९४ ते २०१९ पर्यंत अकोला भातृमंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजसेवेसाठी भरीव कार्य केले आहे. यावेळी त्यांनी भातृमंडळाची इमारत बांधकाम आणि विस्तार केला. यवतमाळमधील भातृमंडळासाठीही त्यांनी आपले योगदान दिले आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सांगायचे तर, नानासाहेबांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले आहे. समाजातील तळागाळातील वर्गाला शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी ‘लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ’ सुरु केले. २०१० मध्ये सुरु केलेले ‘पद्मश्री डॉ. वि.भि.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय’ आज हजारो विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण प्रदान करत आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून सुमारे ५०० हून अधिक कर्मचारी वर्गालाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
*आध्यात्मिकता आणि धार्मिकता*
नानासाहेब पाटील यांना आध्यात्मिकता आणि धार्मिकतेची गोडी आहे. त्यांनी वेळोवेळी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे, ज्यातून लोकांना नामस्मरणाचा लाभ मिळतो. त्यांच्या मातोश्री स्व. सुपडाबाई निनू पाटील यांच्या वार्षिक श्राद्धानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. बाबासाहेब महाराज सातारकर यांचे किर्तन मलकापूरकरांना ऐकण्याची संधी मिळवून दिली.
श्री. नानासाहेब पाटील यांचा जीवनप्रवास आणि यशोगाथा प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कष्ट, ठाम विचारधारा, आणि असीम परिश्रमाचा आदर्श घेत, मराठी समाजाने उद्योजकतेच्या मार्गावर वाटचाल करावी, हाच त्यांचा संदेश आहे.
*शब्दांकन: प्राचार्य डॉ. अनिल खर्चे*
पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर