खामगाव:- खामगांव येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात खामगाव तालुक्यासह घाटाखालील सर्व तालुक्यातील रुग्ण आरोग्य सुविधा मिळत असल्याने तपासणीसाठी येतात. मात्र रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. काही दिवसापासून थंडीची चाहूल व बदलत्या वातावरणामुळे रुग्णाचे प्रमाण वाढले आहे. ताप सर्दी खोकला यासह इतर रुग्णात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. योग्य उपचार मिळेल यासाठी येणा-या रुग्णाला तासतास डॉक्टरची वाट पहावी लागत आहे. डॉक्टर उशीरा आल्याने तपासणीसाठी रुग्णाच्या लांबच लांब रांगा लागुन आहे. डॉक्टर उशीरा आल्याने एखाद्या वेळी रग्णाची तब्येत खराब होवून आपला जीव सुध्दा गमावावा लागू शकतो. याला जबाबदार कोण ? शासन की प्रशासन. याबाबत वारंवार तक्रारी मिळुन सुध्दा रुग्णालय प्रशासन या कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येते.
शहरासह ग्रामीण भागातील सामान्य जनतेला योग्य व चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सरकारने खामगाव शहरात उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्यात आले. त्यामुळे खामगावसह घाटाखाली ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना फायदा होईल. सद्या थंडीची चाहूल व बदलत्या वातावरणामुळे रुग्णाचे प्रमाण वाढले. त्यामुळे रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. सामान्य रुग्णालयात चांगली सुविधा मिळेल यां उद्देशाने ग्रामीण भागातील सामान्य व गोरगरीब जनता मोठया आशेने येत असतो. तर रुग्णालयातील ओपीडी सुरु होण्याची वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण सकाळी 9 वाजेपूर्वीची रुग्णालयात हजर राहतात. मात्र रुग्ण तपासणी करणारे डॉक्टर 9 वाजता वेळेवर हजर न राहता कोणी 9:30 तर कोणी 10:00 वाजेपर्यंत रुग्णालयात आपल्या मनमानी नुसार येतात. यामध्ये काही डॉक्टर तर 10:30 वाजेपर्यंत सुध्दा येत नाही. डॉक्टर उशीरा आल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागत असल्याने रुग्णाच्या तपासणीसाठी लांबच लांब रांगा लागत आहे. लांबच लांब रांगा लागत असल्याने एखाद्या रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थीत होत असून याबाबत अनेकवेळा तक्रारी करुन सुध्दा रुग्णालय प्रशासन दुलर्क्ष करीत आहे. तरी वरीष्ठांनी याकडे लक्ष देवून संबंधीतांवर कारवाई करावी व रुग्णांची हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.