नांदुरा:- गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलां मुलींसाठी वरदान ठरत असलेल्या राजेश गावंडे यांच्या शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेची क्रांतिकारी वाटचाल होत असून अभ्यासिकेच्या उपक्रमाला सर्वच स्तरातून व्यापक प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.अभ्यासिकेच्या मध्यमातून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले असून अभ्यासिकेसाठी असंख्य दानदाते लाखोंची पुस्तके व लायब्ररी साहित्य देत आहेत.
नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेल्या राजेश गावंडे यांना आधीपासूनच बाजार समितीत शेतीमाल विकन्याकरता आलेल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा दिसत होत्या. शेतकऱ्यांच्या मुलांमुलीकरिता काहीतरी करण्याची त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बाजार समितीच्या संचालक मंडळीसमोर त्यांनी अभ्यासिकेची संकल्पना मांडल्या नंतर नांदुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 ऑक्टोबर 2015 मध्ये शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका सुरु केली.अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची जिद्द पाहता, आर्थिक क्षमता नसलेल्या व मुंबई, पुणे याठिकाणी कोचिंग साठी जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता त्यांनी शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी यूपीएससी शैक्षणिक क्रांती संघटनेची स्थापना केली.आज रोजी विविध धार्मिक स्थळे, ग्रामपंचायती सह जिल्ह्यातील घाटाखालील सर्वच कृ ऊ बा समित्यांमध्ये अभ्यासिका सुरु झाल्या असून गोरगरीब शेतकऱ्यांची पाचशेच्या वर मुले मुली शासकीय सेवेत रुजू झाली आहेत.विदयार्थ्यांना अभ्यासिकेत लागणारी विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके, लायब्ररी साहित्य अनेक दान दाते सढळ हाताने पूरवत आहेत.
सौ कोमलताई तायडे यांचेकडूनसुद्धा तरवाडी अभ्यासिकेला पुस्तके भेट..
सौ कोमल ताई सचिन तायडे यांनी सुद्धा “या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेन संस्थिता” या मंत्राचा परिचय देत घटस्थापनेच्या दिवशी तरवाडी येथील बर्डेश्वर संस्थांनच्या पायथ्याशी असलेल्या अभ्यासिकेसाठी पुस्तके भेट दिली.यावेळी राजेश गावंडे यांचेसह नंदूभाऊ खोदले,वीरेंद्र सिंग राजपूत,अंनत वडोदे,सुरेश पाटील, पद्माकर ढोले,विजय डीवरे,गोविंद अढाव,विनायक अढाव,पंजाबराव कुटे,ईश्वर कुटे,संतोष कुटे, अनिल वानखडे,यांचे सह अनेक विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
@ शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचा नांदुरा पॅटर्न राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राबवावा यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदने दिली असून त्याचे महत्त्व सुद्धा पटवून दिले आहे, सोबतच विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या एक लाख सह्यांचे निवेदनही शासनास दिले आहे.बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळासहित घाटाखालील जवळपास सर्वच तालुक्यात शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका सुरू झाल्या असून पाचशेच्या वर गोरगरीब शेतकऱ्यांची मुले मुली शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.महाराष्ट्रातील प्रत्येक कृ ऊ बा समित्या मध्ये शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका उपक्रम राबविण्यासाठी शासन स्तरावर आम्ही प्रयत्न करीत असून शासन यावर लवकरच शिक्कामोर्तब करेल अशी खात्री आहे.
…… राजेश गावंडे.)