सिंदखेडराजा येथे बँकेसमोरून भरदिवसा मोटारसायकल डिक्कीतून अडीच लाखांची चोरी!

 

सिंदखेडराजा: शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेसमोर उभी असलेल्या मोटारसायकलची डिक्की फोडून अज्ञात चोरट्याने अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. चिंचोली जहागीर (ता. सिंदखेडराजा) येथील शेतकरी अनिल राठोड हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर आपल्या एम. एच. २८ एएम १३६१ क्रमांकाच्या मोटारसायकलजवळ उभे राहून नातेवाईकांशी संवाद साधत होते. त्याच दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेली गुलाबी रंगाची थैली चोरी केली. चोरीस गेलेल्या थैलीत अडीच लाख रुपये रोख, तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलांचे पासबुक, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, चेकबुक, गॅस पुस्तिका आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिल राठोड यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, भरदिवसा बँकेसमोर अशा प्रकारे चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!