शेगाव :- येथील मंदिर परिसरात लहुजी वस्ताद चौकात दर्शनासाठी आलेल्या अकोला येथील भाविकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम जगदीश श्रीवास (वय २९, रा. अकोला) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह गजानन महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर आले असता आरोपी कार्तिक वानखडे याने त्यांच्या पत्नीसमोर धुंकले. श्रीवास यांनी यावर आक्षेप घेत ‘थोडं पाहून धुंका’ असे सांगितले असता त्याने शिवीगाळ केली. त्यावर ‘शिवीगाळ करू नका’ असे सांगितल्याने वाद वाढला आणि आरोपींनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, श्रीवास यांचा भाऊ सुजल हा मध्यस्थी करण्यास गेला असता त्यालाही कार्तिक वानखडे, अनुराग तायडे, कृष्णा वाघ आणि गणेश वानखडे यांनी मारहाण केली. तसेच, एक्वाच्या कॅनने डोक्यावर प्रहार करून लोखंडी पाईपने गंभीर जखमी केले. श्रीवास यांची पत्नी, आई आणि बहीण यांनी मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच, ‘तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.